पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेजारी राहणाऱ्या ६५ वर्षीय नराधमाने सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमजान बागवान या आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित कुटुंब आणि आरोपीचे कुटुंबीय दोघेही मजुरीचे काम करतात. पीडित मुलींचे आई-वडील, आजोबा आणि काका कामावर गेलेले असताना, आरोपीची पत्नी आणि मुलगाही मजुरीसाठी बाहेर गेले होते, मात्र आरोपी घरीच थांबला होता. इयत्ता चौथीमध्ये शिकणारी १० वर्षांची मुलगी आणि तिची ४ वर्षांची लहान बहीण घरात असताना हा प्रकार घडला.

दुपारच्या वेळी १० वर्षीय पीडिता कपडे धुण्यासाठी बाहेर आली असता, आरोपीने आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून तिचे तोंड दाबले आणि तिला स्वतःच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार शेजारच्या एका महिलेने पाहिला होता आणि तिने याची माहिती पालकांना दिली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर पीडितेने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
चौकशीदरम्यान समोर आले की, आरोपीने १० वर्षीय मुलीवर मागील दीड महिन्यात अशा प्रकारे तब्बल चार वेळा अत्याचार केला होता. एवढेच नव्हे तर, काही दिवसांपूर्वी त्याने ४ वर्षांच्या लहान बहिणीवरही एकदा असाच अमानुष प्रकार केला असल्याचे समोर आले. कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही या नराधमाने दिली होती.
या घटनेची माहिती मिळताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी तात्काळ वाकड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत नराधम रमजान बागवानविरोधात पोक्सो (POCSO) आणि ॲट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला तात्काळ अटक केली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






