विशाल शिंदे
Bhor News नसरापूर, ता. 30 : लग्नाच्या उत्साहात रंगलेले घर एका क्षणात दहशतीत बदलले. हळदी समारंभ आटोपून परतत असताना मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात नवरा-नवरीसह नऊ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना राजगड तालुक्यातील घिसर गावात घडली. सुदैवाने सर्वांची प्रकृती स्थिर असून वेल्हे ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. Bhor News

मिळालेल्या माहितीनुसार, संकेत शिंदे व संध्याराणी धिडले यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. त्याआधी पारंपरिक पद्धतीनुसार जुगाई देवी मंदिरात हळदीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी सुमारे दहा वाजता नवरा-नवरीसह नातेवाईक मंदिरात गेले होते. विधी संपल्यानंतर सर्वजण पायवाटेने गावाकडे परतत असताना जंगल परिसरातील झुडपांमध्ये असलेल्या मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. Bhor News

या अनपेक्षित हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी लोकांनी सैरावैरा पळ काढला. सुमारे २० ते २५ जणांच्या समूहावर मधमाशांनी झडप घातली. त्यापैकी नऊ जण जखमी झाले. जखमींना लग्नासाठी उपलब्ध असलेल्या वाहनांतून तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलीस पाटील सुनील धिडले यांनी दिली. जखमींमध्ये सहा पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे. Bhor News
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत भोईटे यांनी सांगितले की, सर्व जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. आवश्यक उपचारानंतर त्यांना लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. या घटनेमुळे लग्नघरातील आनंदावर काही काळासाठी विरजण पडले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. Bhor News







