जीवन सोनवणे
Bhor News : भोर : पुणे-सातारा महामार्गावरील निगडे (ता. भोर) येथे राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आणि मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आला आहे. असा निर्णय घेणारे तालुक्यातील हे पहिलेच गाव असून, या निर्णयाचे पंचक्रोशीत स्वागत होत आहे. येथून पुढे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना फिरकू देणार नसल्याचा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
एसटी स्थानकात लावण्यात आला फ़लक
निगडे येथे सकल मराठा समाजातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. आम्ही मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कायमस्वरूपी असून, त्यांच्या भूमिकेला आम्ही शेवटपर्यंत समर्थन देणार आहोत. आरक्षणाअभावी आमच्या अनेक पिढ्या मागे पडल्या आहेत. (Bhor News) येथून पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी या आरक्षणाच्या लढाईत आम्ही सर्वांबरोबर असणार व मराठा आरक्षणाचा लढा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही मराठा आरक्षणासाठी काहीही करायला तयार असल्याचे मत मराठा समाजाच्या युवकांतर्फे या वेळी व्यक्त करण्यात आले.
पूर्वीचा आणि आताचा मराठा समाज यामध्ये खूप बदल झाला आहे. ((Bhor News) आज नोकरी, शिक्षणामध्ये आरक्षणाची अत्यंत गरज आहे. आम्ही छत्रपती शिवरायांचे विचार मांडणारे असून, मराठा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न जर राजकीय मंडळी करत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न सकल मराठा समाजाकडून करण्यात येईल.
सकल मराठा समाजाच्या वतीने ‘राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार’ असा मोठा फलक एसटी बस स्थानकासमोर लावण्यात आला आहे. (Bhor News) या वेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवक उपस्थित होते.