नवी दिल्ली : भारतात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. सायबर चोरटे नवनवीन युक्त्या लढवून लोकांना फसवत असतात. त्यात TRAI म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नावाने नवा स्कॅम होत आहे. हा स्कॅम खूप धोकादायक असा ठरत आहे. त्यामुळे तुमची एक चूक खूप महागात पडू शकते.
ट्रायच्या नावाने होत असलेल्या या स्कॅमबाबत खुद्द ट्रायनेच लोकांना सावध केले आहे. ट्रायने X वर एक पोस्ट लिहित म्हटले की, ‘जर तुम्हाला देखील ट्रायच्या नावाने कॉल आला आणि दावा केला की आज रात्री तुमचा नंबर बंद होईल तर सावध व्हा. कारण हा एक स्कॅम असू शकतो. ट्रायने लोकांना चक्षू पोर्टलवर अशा कॉलची तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. जेव्हा तुम्हाला असा कॉल येतो तेव्हा तुमचा कोणताही नंबर दाबू नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. त्याने डिजिटल अरेस्ट स्कॅम होऊ शकतो.
भारतात वाढतोय ‘डिजिटल अरेस्ट’चा स्कॅम
सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील लोकांनी जानेवारी ते एप्रिल 2024 दरम्यान ‘डिजिटल अरेस्ट’ स्कॅममधून सुमारे 120.3 कोटी रुपये गमावले आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’च्या 115 व्या भागात ही माहिती दिली. सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या चिंतेवर त्यांनी भर दिला.