पुणे : पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी किल्ल्यावर आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात 16 पर्यटक जखमी झाले असून त्यात पाच बालकांचा समावेश आहे. गेल्या तीन महिन्यातील जुन्नरमध्ये झालेली ही चौथी घटना आहे.
किल्ले शिवनेरीवर मुंबईचे काही पर्यटक आले होते. त्यांनी लावलेल्या परफ्युमच्या वासाने माश्या चौथाळल्या त्यांनी परिसरातील शिवभक्तावर हल्ला चढवला. या प्रकाराने किल्ल्याच्या पायथ्याकडे सर्वजण पळत सुटले. या घटनेची माहिती मिळताच जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुग्णवाहिकेसह गड पायथ्याजवळ आले. मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्याना छत्रपती शिवाजी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान शिवनेरी किल्ल्यावर रविवारी घडलेल्या घटनेनंतर काही काळ शिवभक्तांना किल्ल्यावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला तसेच घटनेची व्याप्ती पाहता, पुन्हा लगेच कोणावर हल्ला होऊ नये, यासाठी किल्ला दोन वाजेपर्यंत बंद करण्यात आल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले.