(Beed News) बीड : डोंगरपिंपळा (ता. अंबाजोगाई, जि. बीड) येथील साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गावात एका चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली लागल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
१० बाय १० आकाराचे चार गाळे बांधले…!
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी डोंगरपिंपळा ग्रामपंचायतने १० बाय १० आकाराचे चार गाळे बांधले होते. यातून काहीतरी आर्थिक उत्पन्न होईल म्हणून, ग्रामपंचायतने बांधलेले गाळे ११ महिन्याच्या करारावर भाड्याने देण्याचे ठरवले. या लिलावात सहभाग घेण्यासाठी पाच हजारांची अनामत रक्कम घेण्यात आली. जवळपास दहा लोकं यात सहभागी झाले. व या गाळ्यांची सोमवारी बोली लागली.
लिलावात पुढे बोली सुरु झाली आणि वाढत गेली. पाहता-पाहता एकमेकांचे आकडेही वाढू लागले. ही बोली २० लाखाच्या पुढे गेली. तेव्हा एका गाळ्यासाठी ११ महिन्यांसाठी भाडेतत्वावर घेण्यासाठी चहाच्या टपरीवाल्याने चक्क ३० लाखांची बोली लावली. त्याच्या ३० लाखाच्या बोलीच्यापुढे आणखी रक्कम वाढवण्याची इतर कोणाची हिम्मत झाली नाही, आणि शेवटी तीस लाखात गाळ्याचा लिलाव झाला. आणि टपरी चालकाने गाळा मिळवला.
दरम्यान, या बोलीत चहाची टपरी, झेरॉक्स, सलून दुकानदारांनी सहभाग घेतला. पण यातील एक गाळ्याची बोली ३० लाखापर्यंत गेली. विशेष ३० लाखांची बोली लावणारा व्यक्ती हा एक चहा वाला होता. तर गावातील चहाच्या टपरीसाठी तब्बल ३० लाखाची बोली लागल्याने गावकऱ्यांनी तोंडात बोट घातले. तर या लिलावा पेक्षा चहाच्या टपरीसाठी तीस लाखांची बोली लावल्याचीच परिसरात अधिक चर्चा आहे.