बारामती, (पुणे) : राहत्या घरात टेबल पंख्याच्या वायरीचा करंट लोखंडी खाटेला लागल्याने खाटेवर झोपलेल्या पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सांगवी (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. 01) मध्यरात्री ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नवनाथ रामा पवार (वय 40) व त्यांच्या पत्नी संगीता नवनाथ पवार (वय 38, रा. सांगवी, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे. ते नंदीवाले समाजाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व एक विवाहित मुलगी, असा परिवार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ पवार व त्यांच्या पत्नी संगीता पवार यांचा यात्रा-जत्रांमध्ये खेळणी विकण्याचा छोटा व्यवसाय होता. मंगळवारी रात्री अवकाळी पावसामुळे सर्वत्र विजेचा खोळंबा उडाला होता. रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे मात्र, रात्री पाऊस व वारा जोरात सुरू झाला होता. यावेळी त्याच वेळी शेजारी लोखंडी स्टूलवर ठेवलेल्या पंख्याच्या वायरला शॉर्टसर्किट झाले आणि वीजप्रवाह सुरू असलेली वायर पवार पती पत्नी झोपलेल्या लोखंडी कॉटवर पडली.
दरम्यान, झोपेच्या अवस्थेत असलेल्या पवार पती- पत्नीला काही समजण्याच्या आतच विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. दोघेही सकाळी उठून घराबाहेर आले नाहीत. त्यामुळे शंका आल्याने कुटुंबातील नातेवाईकांनी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यांना हे दृश्य दिसले. पंख्याच्या वीजेचा धक्का रात्री लागल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी आणखी पुढील अनर्थ टाळण्यासाठी पंख्याचा वीजप्रवाह बंद केला आणि त्यानंतर या पंख्यामुळेच दोघांनाही विजेचा धक्का बसल्याचे लक्षात आले. घटनास्थळी माळेगाव पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.