इंदापुर : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. 4) भाजपला सोडचिट्ठी देत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर शरद पवारांनी त्याच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केलं. तर हर्षवर्धन पाटील हे मोठे नेते आहेत, त्यांच्यावर मी काय बोलू अशी प्रतिक्रिया विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
अशातच आता इंदापूर शहरात बॅनरबाजी सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अज्ञात व्यक्तीकडून शहरात एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करत या बॅनरवर लिहिलं आहे की, आज पवार साहेबांनी इंदापूर तालुक्यात जो निर्णय घेतला.
तो म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार, अशी अवस्था तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची झाली आहे. दोघांनाही जनता कंटाळली होती. माझा राजा असा नव्हता, अशा आशयाचे बॅनर लावण्यात आला आहे. हा बॅनर लावून हर्षवर्धन पाटलांसमोर एक प्रकारचे आव्हानं निर्माण केलं आहे. दरम्यान, हा बॅनर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनीच लावला असावा, अशी चर्चा शहरात सुरु आहे.