पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे -अहमदनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शुक्रवारी (ता. ०७ नोव्हेंबर ते ०६ डिसेंबर या कालावधीत अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली आहे. हा आदेश तात्काळ लागू करण्याच्या सूचना हि देण्यात आल्या आहेत.
पुणे- अहमदनगर महामार्गावर २० कि.मी तसेच शिकापुर चाकण मार्गावरील ०९ कि.मी. भागात मोठया प्रमाणात रोडलगत गोडावुन, हायस्कुल, कॉलेज, मंगल कार्यालय, हॉस्पीटल, तसेच एम.आय.डी.सी क्षेत्र असुन सदर भागात ठिकठिकाणी रोड क्रॉसिंग आहेत. त्यामुळे सदर भागात अवजड वाहनांमुळे नेहमीच वाहतुक कोंडी होत असल्याने अपघात होत असतात.
पुणे अहमदनगर रोड हा कोरेगांव भिमा, सणसवाडी, शिकापुर कोंढापुरी या गावांचे हददीतुन जात आहे. चाकण व रांजणगांव एम.आय.डी.सी कडुन मोठया प्रमाणात अवजड वाहने सदर भागात रोडवर येत असतात. त्याचप्रमाणे स्कुल बसेस विदयार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते. तसेच रांजणगांव व चाकण एम.आय.डी.सी येथे जाणारे मालक व कामगार वर्ग यांच्या बसेस व खाजगी वाहनांची नमुद वेळेत मोठया प्रमाणवर ये-जा होत असते.
पुणे-नगर रोडवर नेहमी वाहतुक कोंडी होवुन बाहेरगावी जाणाऱ्या व स्थानिक लोकांची गैरसोय होते तसेच अपघाताच्या वेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होत असतो. त्यामुळे उपाययोजना म्हणुन अवजड वाहनांची वाहतुक सकाळी ७: ३० ते ९ : ३० व सायंकाळी ४ ते ८ यावेळेत पुणे-अहमदनगर व शिकापुर चाकण रोडवर बंद करण्यात यावे याबाबत आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना दिले आहेत. त्यावर प्राप्त हरकतींवर सर्व संबंधित यंत्रणांची दिनांक शुक्रवारी (०४) बैठक घेण्यात आली आहे
दरम्यान, सदर प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे -अहमदनगर रस्त्यावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतुक बंद ठेवण्यात येणार असल्याचे माहिती परिपत्रकाद्वारे दिली आहे.
सदरील अवजड वाहने वाहतुक मार्गात केलेल्या बदलांच्या अनुषंगाने नियमांचे पालन नागरीकांनी करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नागरीकांना केले आहे.