नवी दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. या निकालामुळे ज्या कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करत आंदोलन केले होते, त्यांच्यात मोठी नाराजी पसरली आहे. संजय सिंह हे अध्यक्ष होताच बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचं नेतृत्व केले होते. दरम्यान, संजय सिंह निवडणूक जिंकल्यानंतर कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. तर कुस्तीपटू बजरंग पुनिया यानेही एक मोठा निर्णय घेतला आहे. “मी माझा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांना परत करणार आहे”, अशी त्याने घोषणा केली होती. त्यानुसार बजरंगने त्याच्या पुरस्काराचा त्याग केला आहे.
VIDEO | Wrestler @BajrangPunia stopped at Delhi’s Kartavya Path by Delhi Police officials. Earlier today, Punia announced on X that he is returning his Padma Shri award to the PM. pic.twitter.com/cQUg3gpzDK
— Press Trust of India (@PTI_News) December 22, 2023
पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केल्यानंतर काहीच वेळातच बजरंग पुनिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार परत करण्यासाठी निघाला. परंतु, पीएम आवासाजवळ तिथल्या सुरक्षारक्षकांनी बजरंगला अडवले. बजरंग पंतप्रधानांपर्यंत काही पोहोचू शकला नाही. त्यामुळे त्याने पंतप्रधानांच्या घराजवळच्या पदपथावर (फूटपाथ) त्याचा पद्मश्री पुरस्कार ठेवला आणि तिथून निघून गेला.