उरुळी कांचन, (पुणे) : “खडकवासला धरणातून जुन्या मुळा-मुठा अर्थात बेबी कालव्यात गेल्या आठ दिवसांपासून क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले जात आहे. त्यामुळे उरुळी कांचन परिसरातील पांढरस्थळ येथील कालवा फुटून पाणी थेट पुणे – सोलापूर महामार्गावर गेले आहे. कालव्यातील जलपर्णी व इतर गवतामुळे हा कालवा फुटला आहे. सदर कालव्यातील पाण्याचे प्रमाण कमी करावे, अशी विनंती शिवसेना नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन यांनी केली होती. मात्र, खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवत पाणी कमी करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे कालवा फुटला असल्याचा आरोप केला जात आहे.
खडकवासला धरणातून जुन्या बेबी कालव्यात पाणी सोडले आहे. पाणी सोडण्याच्या अगोदर कोणतीही कालवा सफाईची कामे करण्यात आलेली नाहीत. उरुळी कांचन येथील पांढरस्थळ परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरातही हे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे घरातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले.
यवत येथील पाटबंधारे विभागाचे अभियंता सचिन पवार यांना वारंवार फोनवरून बेबी कालव्यात पाणी जास्त झाले आहे. कालवा फुटण्याच्या मार्गावर असून पाणी कमी करण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी शेतकरी व परिसरातील नागरिकांचे न ऐकता पाणी तसेच सुरु ठेवले. कालव्याची अनेक दिवसांपासून दुरूस्ती न झाल्याने सदर ठिकाणी भराव कमजोर होऊन घळ पडल्याने कालवा फुटला व पाणी थेट पुणे – सोलापूर महामार्गावर गेले.
दरम्यान, अलंकार कांचन यांनी अभियंता सचिन पवार यांना फोनवरून कालवा फुटल्याची माहिती दिली. मात्र, पवार हे उर्मट भाषेत एवढ्या छोट्या गोष्टीसाठी रात्री फोन करता का? असे सांगितले. यावरून अधिकाऱ्यांना या घटनेचे घटनेचे किती गांभीर्य आहे, हे सर्वांसमोर आले आहे. कालवा फुटला, तरी अधिकारी अशा उर्मट भाषेत बोलतात. त्यामुळे उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन यांनी स्वतःच्या खर्चाने पोकलेन मशीन बोलावून जलपर्णी काढण्यास सुरुवात केली.
माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “बेबी कालव्यातून क्षमतेएवढे पाणी सोडण्यास एकाही शेतकऱ्यांचा विरोध नाही. मात्र, सध्या पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती. याबाबत पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून व वारंवार फोनवरून वस्तुस्थितीची माहिती दिलेली होती. मात्र, अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे शेतकरी व परिसरातील नागरिक हतबल झाले आहेत.”
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन म्हणाले, “बेबी कालव्यात क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडले आहे. पवार यांना गेल्या चार दिवसांपासून पाणी कमी करण्यासाठी सांगत आहोत. मात्र, पवार हे ऐकून न ऐकल्यासारखे करतात. उरुळी कांचन पाटबंधारे विभागाचे कर्मचारी यांना कॅनॉलला न बोलावता स्वतःच्या पद्धतीनेच अनेक तास पोकलेन मशीन चालवले जाते. चांगले काम केले असते, तर कालवा फुटला नसता. त्यामुळे काहीच काम न करता बिल बनवले जातात. कालवा फुटल्याची माहिती दिल्यावर पवार हे उद्धटपणे उत्तरे देतात. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”
याबाबत यवत पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता सचिन पवार म्हणाले, “गेल्या 8 दिवसांपासून जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. जास्तीच्या मशीन मागवल्या आहेत. उरुळी कांचन येथील पाटीलवस्तीवरील पुलाला जलपर्णी अडकली होती. त्यामुळे पाणी तुंबले होते. रात्रीच्या वेळी जलपर्णी अडकल्याने पाणी कमी उंचीच्या जागेवरून पाणी पुणे – सोलापूर महामार्गावर गेले. कालवा फुटला नाही. रात्री उशिरा सदर घटनास्थळी पोहोचलो होतो.”
View this post on Instagram