सुरेश घाडगे
परंडा : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त परंडा येथील भुईकोट किल्ला येथील श्री शिवशंभु महादेवाची मिरवणुक व महापुजा विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले.
रविवारी (ता. २१) संध्याकाळी भजन, हरीजागर तर सोमवारी पहाटेपासूनच महाभिषेक, ह. भ. प. गीतांजली महाराज अभंग-भुजबळ यांचे किर्तन व सकाळी अकरा ते दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास श्रींची सवाद्य शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक सवाद्य भक्तीमय व उत्साही वातावरणात काढण्यात आली.
यावेळी फुलांनी सजावट केलेल्या जीप रथात शिवशंकर शंभू महादेवाची पुर्णाकृती आकर्षक मुर्ती होती. श्रीकृष्ण मंदिर संस्थान वारकरी सांप्रदायीक गुरुकुल बावी (ता. बार्शी ) येथील बालवारकरी यांचा टाळ-मृदंग दिंडी मिरवणुकीचे आकर्षण होते. तसेच वेळापुर रेणुका सनई वादक, डॉलबी, बँड, हलगी पथक यांचा या मिरवणुकीत सहभाग होता. फटाक्यांची आतीषबाजी करीत किल्ला प्रवेशद्वार व रोडवर भगवे झेंडे व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरासमोर मंडप करण्यात आला होता.
दरम्यान, दुपारी २:३० ते ६ या वेळेत भाविक भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. हजारो भाविक भक्तांनी दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवमंदीर सेवा मंडळ, भुईकोट किल्ला, परंडा पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले. यावेळी परंडा पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.