Ashadhivari News : सोलापूर : विठुनामाचा गजर करत लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरी निघाले आहेत. वारीच्या या महासोहळ्यात राजकीय वारीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांसह सोलापुरात येणार आहेत. ते उद्या पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. या निमित्तानं बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. के. चंद्रशेखर राव हे आज तीनशे गाड्यांच्या ताफ्यासह सोलापूरला येणार आहेत. हेलिकॅप्टरच्या माध्यमातून विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी यात्रेला राजकीय रंग चढणार असे चित्र दिसू लागले आहे.(Ashadhivari News)
लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरी निघाले आहेत.
दरम्यान, ‘अब की बार, किसान सरकार’ असे म्हणत महाराष्ट्रात जोरदार एंट्रीच्या तयारीत असणारे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी थेट वैष्णवांचा महामेळा असणाऱ्या आषाढी यात्रेचा मुहूर्त निवडला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात येण्याच्या एक दिवस आधीच के. चंद्रशेखर पंढरपूरमध्ये हजेरी लावणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.(Ashadhivari News)
बीआरएस पक्षाला आता महाराष्ट्रात आपला विस्तार करायचा आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेड, छत्रपती संभाजीनगर यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपलं लक्ष सोलापूर जिल्ह्यावर केंद्रित केलं आहे. के. चंद्रशेखर राव हे आजपासून दोन दिवसीय सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.(Ashadhivari News) मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला असून, ते हेलिकॉप्टरऐवजी कारने सोलापूरमध्ये येणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव केटीआर आणि जावई तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव हे देखील असणार आहेत. केसीआर यांच्यासोबत तीनशे गाड्यांचा ताफा असणार आहे.
दरम्यान, आषाढीला गेली अनेक वर्षे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंग येत असतात. पण ते फक्त श्रद्धेसाठी इतकी वर्षे वारी करीत आहेत. मात्र, देशात शेतकऱ्यांचे राज्य आणण्याची घोषणा देत कामाला लागलेले चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाच्या गळाला महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते लागले आहेत. यातच महाराष्ट्रात पक्षाचा प्रचार अधिक जलदपणे करण्यासाठी ‘बीआरएस’ने वारकरी संप्रदायाच्या महासोहळ्याची निवड केली आहे.(Ashadhivari News)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळासह पांडुरंगाचे दर्शन घेणार आहेत. विठ्ठलाच्या मंदिरावर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पृष्टी करण्यात येणार आहे. सरकोली येथे बीआरएस पक्षाचा शेतकरी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे बीआरएसमध्ये प्रवेश करणार आहेत.
काही दिवसापूर्वी पंढरपूरचे भगीरथ भालके यांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन बीआरएस पक्षात प्रवेश संदर्भात चर्चा केली होती. भगीरथ भालके यांना तेलंगणामध्ये आणण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी खास विमान पाठवले होते. आता आषाढीला राव येत असताना त्यांच्या जोरदार स्वागतासाठी भगीरथ भालके आणि त्यांची भलीमोठी टीम सज्ज असणार आहे. आता आषाढीला येणाऱ्या या राजकीय नेत्यांपैकी पंढरीचा पांडुरंग कोणाला पावणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Ashadhivari News)