पुणे : पुण्यातून एक विचित्र अपघाताची घटना समोर येत आहे. वारजे ब्रिजवर तब्बल दहा वाहने एकमेकांवर आदळल्याची घटना घडली आहे. हि घटना २ सप्टेंबर रोजी मुंबई-बंगळूर रस्त्यावर हैद्राबाद बिर्याणीसमोर साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातग्रस्त वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती मिळत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वारजे येथून जाणाऱ्या मुंबई बंगळूर महामार्गावर तीव्र उतार आहे. सायंकाळी 7.30 वाजता चांदणी चौकाकडून एक टाटाच्या चारचाकी वाहनाने मारुती स्विफ्टला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर त्या वाहनावर नियंत्रण मिळवताना पाठीमागून येणारी वाहने एकमेकावर जोरदार आदळल्यामुळे हा विचित्र अपघात घडला आहे.
या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्यात असून इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करण्यात आली. त्यानंतर वाहतूक कोंडी कमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.