लोणी काळभोर, (पुणे) : हिंदी, मराठी गाण्यांचा तडका त्यात पौराणिक प्रसंग, विविध ऐतिहासिक व पौराणिक गीते, पारंपारिक नृत्य अशा वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी नृत्य करत उपस्थित असलेल्या पालकांनाही डोलायला भाग पाडले. यामध्ये मुलांनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला. त्यामुळे स्नेहसंमेलनाची रंगत चांगलीच वाढली होती.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून लोणी काळभोर (ता. हवेली) येथील रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण सर्वांसमोर यावेत यासाठी शिक्षक आणि व्यवस्थापनाने दोन दिवसीय ‘रेट्रो’ थीम या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नर्सरी ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सांस्कृतिक महोत्सवाची सुरुवात दीपपूजनाने करण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विजय कुंजीर, राजाराम माने, स्कुलचे चेअरमन नितीन काळभोर, सेक्रेटरी मंदाकिनी काळभोर, खजिनदार रामदास काळभोर, रेनबो स्कुलच्या प्रिन्सिपल मिनल बंडगर, रेनबो किड्स स्कुलच्या प्रिन्सिपल ऐश्वर्या काळभोर, व्हाईस प्रिन्सिपल प्रशांत लाव्हरे, पर्यवेक्षक पायल बोळे, अक्षय काळभोर, प्रथमेश काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
बॉलिवूडच्या गौरवशाली इतिहासातुन काळाच्या पडद्यावर अजरामर झालेल्या विशिष्ट फॅशन, संगीत आणि कलात्मकतेने सजलेल्या सदाबहार गीतांची मैफिल म्हणजेच रेट्रो थीम.. आणि या रेट्रो थीमला साजेशी विद्युतरोषणाई आणि सजावटीने नटलेल्या व्यासपीठावर थिरकणाऱ्या स्कुलच्या विद्यार्थ्यांनी 70 -90 च्या दशकांतील फॅशन, संगीत आणि नृत्य यांचा प्रभावी आविष्कार घडवून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. नृत्य शिक्षक अश्विन मनगूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली 7 वीच्या विद्यार्थ्यांनी ‘खट्टा मिठा’ सिनेमातील रोडरोलरचा कॉमेडी ऍक्ट सादर करून धम्माल उडवून दिली.
नितीन काळभोर म्हणाले, “रेट्रो थीमद्वारे आपण काळाच्या पडद्यावर अजरामर झालेल्या कलाकृतींचे स्मरण करून कलेचा हा समृद्ध वारसा आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवत आहोत.” विजय कुंजीर यांनी शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. संगीत शिक्षक शिवराज साने व संदिप शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुरेल समूहगीत सादर केले.
दरम्यान, किशोर कुमार, मन्ना डे, महंमद रफी या गीतकारांच्या आणि दिलीप कुमार, मनोज कुमार, मेहमूद, अमिताभ बच्चन, वैजयंती माला, साधना, सुभलक्ष्मी, माधुरी या महान कलाकारांच्या अजरामर कलाकृतींचा आनंद घेताना बॉलिवूडचा गौरवशाली वारसा नवीन पिढीकडून जपल्याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाची वेशभूषा आणि नेपथ्यरचनेची जबाबदारी कलाशिक्षक दिपक शितोळे यांनी सांभाळली. तर बैठक व्यवस्थेचे आयोजन दिपक शितोळे यांनी केले होते. स्नेहसंमेलनामध्ये स्कुलच्या शिक्षिका ऋतुजा देशमुख, निलोफर तांबोळी, प्रियांका ढवळे व कु. निकिता काळे यांनी दिन दिवस सूत्रसंचालन केले.