पुणे: शहरातील गँगवॉरच्या (Andekar Gang Pune) पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी (Pune Crime) आंदेकर टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात टोळीयुद्धातून तरुण आयुष कोमकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आंदेकर टोळीचा प्रमुख आणि इतर गुंडांना अटक केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी टोळीच्या दहशतीवर अंकुश आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

माहितीनुसार, आंदेकर टोळीने गेल्या काही वर्षांत पुण्यात खंडणी, दादागिरी तसेच अवैध धंद्यांच्या माध्यमातून आपले साम्राज्य उभारले होते. पोलिसांनी टोळीच्या उत्पन्नाचे धागेदोरे शोधण्यास सुरुवात केली. चौकशीत असे निष्पन्न झाले की आंदेकरकडे उत्पन्नाचा कोणताही अधिकृत स्रोत नसताना शंभर कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. यात मुख्यतः अनधिकृत मार्केट आणि सेच परवानगीविना उभारलेली बांधकामे यांचा समावेश आहे.

गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीच्या अनधिकृत मालमत्तांवर थेट कारवाई केली आहे. आंदेकरने उभ्या केलेल्या मार्केटवर बुलडोझर चालवण्यात आला, तर अनेक ठिकाणी उभारलेली बेकायदेशीर बांधकामे पाडण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमुळे टोळीच्या इतर सदस्यांमध्ये भयचं वातावरण पसरले आहे.

यासह, पोलिसांनी आंदेकरच्या संपत्तीबाबत आयकर विभागाला पत्रव्यवहार करून पुढील चौकशीची मागणी केली आहे. उत्पन्नाचा अधिकृत स्रोत नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कशी उभारली, याचा तपास आता आयकर विभाग करणार आहे.
आंदेकरच्या बँक खाती गोठवल्यानंतर पोलिसांनी घरातील प्रत्येक वस्तूची मोजदाद करून त्यांचे मूल्य निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घरातील वस्तू महागड्या असून, त्यांचे मूल्य लाखोंमध्ये असेल. याद्वारे आंदेकरची बेहिशेबी मालमत्ता अधोरेखित करण्याचा उद्देश आहे.
पुणे पोलिस आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे की, गुन्हेगारीतून उभारलेले साम्राज्य संपवण्यासाठी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरू राहील. आंदेकर प्रकरणामुळे शहरात गुन्हेगारीविरोधात पोलिसांची ठाम भूमिका अधोरेखित झाली असून, इतर टोळ्यांमध्ये सुद्धा सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.







