अजित जगताप
सातारा : कोणताही व्यवसाय हा कच्च्या मालावर अवलंबून असतो. त्यामुळे ज्या गोष्टींना मागणी जास्त त्यांच्या व्यवसायात स्पर्धा ही जास्त असते. त्यातून सवलतीने जन्म घेतला असला तरी आज सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सवलतीचे फलक लावण्यास चक्क काही वैद्यकीय व्यवसायिक संघटनेनेच विरोध केल्याने अशा व्यवसायिकांच्या सामाजिक बांधिलकी बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
पूर्वीच्या काळी शहरी व ग्रामीण भागात सामाजिक कर्तव्य पार पाडली जात होती. वैद्यकीय व्यवसायिकांना देव मानले जात होते. तीन पिढ्याची काळजी घेणारे मानवतावादी वैध होते. हाताची नाडी तपासून औषधे दिली जात होती. माफक दरात उपचार होत असल्याने सर्व सामान्य माणसाला दिलासा मिळत होता. आता वैद्यकीय व्यवसाय हा पैशाला प्राधान्य देणारा ठरला आहे.
एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला ही पूर्वी नैतिकता मानली जात होती. आता आजारी माणूस पडला तर रक्त,लघवी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, इंडोस्कोपी, एम आर आय, एक्सरे अशा तपासणी केल्यानंतरच त्याचा रिपोर्ट पाहून महागडी औषधे दिली जात आहेत. काही ठिकाणी तर त्याच दवाखान्यातच औषधे घेतली पाहिजे. अशी एकाधिकारी पद्धत रूढ झाली आहे. असा आरोप नेहमीच होत असताना आता औषधे बाबत सवलतीचे फलक लावू नयेत. यासाठी काही ठिकाणी वैधकीय व्यवसायिकांना रस्त्यावर दर्शनी भागात तसे फलक लावू नये. यासाठी प्रयत्न केला जात असल्याची बाब पुढे आली आहे.
जनरेटिक औषधे स्वस्त असून उपचारासाठी रामबाण उपाय ठरला आहे पण, त्यामध्ये आर्थिक फायदा कमी असल्याने त्याची दुकाने चालविताना सामाजिक बांधिलकी जपावी लागते. याचे ही भान ठेवून सध्या अनेक ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय केला जात आहे. ही कौतुकास्पद बाब मानली जात आहे. सर्वच वैधकीय व्यवसायिक हे पैशाला महत्त्व देत नाहीत. हा आशेचा किरण असला तरी काही ठिकाणी मोनोपौलिसी राबवली जात आहे. तिथेच उपचार तेथिलच औषधे पण, रुग्ण बरा झाला नाही तर त्याची जबाबदारी स्वीकारली जात नाही. हे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. आता असे असताना सवलतीची फलकाची बंदी कशासाठी?असा मार्मिक प्रश्न विचारला जात आहे.
सणासुदीला अनेक खरेदीसाठी सवलतीची बरसात होत असताना काही वैधकीय व्यवसायातील संघटना सामाजिक बांधिलकी विसरून वागत आहेत. हे अशोभनीय वाटू लागले आहे. या क्षेत्रात मोठ्या भांडवलदारांच्या गुंतवणूकीने लहान व्यापाऱ्यांची खूप मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच महाराष्ट्रात दरवर्षी दोन ते तीन लाख नवीन फार्मसिस्ट शिक्षण पूर्ण करून युवक बाहेर पडत आहेत. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ही बाब सुध्दा लक्षात घेणे गरजेचे आहे. असा ही सूर उमटत आहे.
यापूर्वी कोणत्याही प्रकारची औषधोपचार किंवा औषधांवर सवलत दिली जात नव्हती. परंतु, अलीकडे सवलत दिल्याशिवाय पर्याय राहिला नाही. तसेच मेडी क्लेमच्या व्यवसायाने जन्म घेतला आहे. त्यामुळे आता संघटना सुध्दा हतबल झाल्या असून ज्यावेळी ऑनलाइन पद्धत आली. तेव्हा मोठ्या कंपन्या शांत बसल्या होत्या. आता ही वैधकीय क्षेत्रात शांततेचे वातावरण असून मोठा मासा लहान माश्याला खातो. याचा अनुभव सर्वांनाच नकळत घ्यावा लागत असून नेमके अच्छे दिन कोणाला?याची उलट तपासणी होऊ लागली आहे.
दरम्यान, याबाबत आवाज उठविण्यासाठी विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेण्याच्या हालचाली सुरू केल्याचे दिसून येत आहे. या क्षेत्रात आता मानवतेला प्राधान्य दिले तरच सर्वांचे भले होणार आहे. अन्यथा फक्त पावडर, साबण विकण्याची वेळ येईल असा इशारा काहींनी दिला आहे.