जुन्नर, (पुणे) : बस स्थानकातून महिला प्रवाशाचे दागिने चोरणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील दोन सराईत चोरट्यांना आळेफाटा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
कुणाल गायकवाड (वय 31 रा अंबरनाथ ठाणे) आकाश रणदिवे (वय 26 रा उल्हासनगर ठाणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून सोन्यासह एक कार असा 7 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळेफाटा बस स्थानकातून 18 जुन 2024 रोजी नारायणगाव येथे जाण्यासाठी एसटी बसमध्ये चढत असलेल्या आशाताई किसन बांडे यांच्या हातातील बारा ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आळेफाटा येथील बसस्थानकात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरून नेली. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर चोरीच्या घटनेचा पोलीस तपास करीत असताना गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी हे इरटीगा मोटारीतून आळेफाटा येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी नाकाबंदी करून कुणाल गायकवाड व आकाश रणदिवे यांना गाडीसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली असता सदरचा गुन्हा त्यांनी कबूल केल्याची कबुली दिली.
दरम्यान, त्यांच्याकडून 12 ग्रॅम सोन्याची लगड व गुन्ह्यात वापरलेली इरटीगा मोटार, असा एकूण 7 लाख 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपींवर ठाणे जिल्ह्यातही त्यांचेवर गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कामगिरी पोलिस निरीक्षक दिनेश तायडे पोलिस हवालदार भीमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नविन अरगडे, ओंकार खुने, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.