पिंपरी : येत्या रविवारी कार्तिकी वारी आहे, यासाठी आळंदीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत आहे. टाळ-मृदुगांच्या जयघोष आळंदी परिसरात होत आहेत. वारकऱ्यांच्या दिंड्या आळंदीत दाखल होत आहेत. कार्तिकी वारीसाठी पंढरपूरहून परंपरेने येणारा संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत दाखल झाला आहे.
शनिवारपर्यंत अजून गर्दी होण्याची शक्यता आहे. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी नगरपालिका प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी तयारी केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानतर्फे भाविकांसाठी नदीपलीकडे दर्शनबारीची उभारणी करण्यात आली आहे. भाविकांना खिचडीचे अखंड वाटप सुरू आहे. परंपरेचे दिंडीकरी, फडकऱ्यांना दर्शनाची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांसाठी यात्रा काळात चोवीस तास आरोग्य सुविधा उपलब्ध आहे.
पूजेचा वेळ वगळता २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. आळंदी आणि परिसरात मलेरिया, डेंगीबाबत सर्वेक्षण सुरू आहे. नगरपालिका यंत्रणा त्यासाठी सज्ज आहे. शहरात पाच ठिकाणी आरोग्य बूथ सुरू करण्यात आले आहेत. ग्रामीण रुग्णालयात दोन आपत्ती कक् उभारण्यात आले आहेत.
स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, पुणे महापालिका, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, हिंजवडीसाठी जादा पीएमपी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात आणि गर्दीच्या ठिकाणी दहा पोलिस मदत केंद्र उभारण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी सुमारे १७०० पोलिसांची कुमक मागविण्यात आली आहे.