पुणे : काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी अजित पवार महायुतीची साथ सोडून मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत होते, असे विधान केले होते. लोंढे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते.लोंढे यांच्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते विकास लवांडे यांनी दुजोरा दिला आहे.

विकास लवांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी 2026 रोजी पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे त्यांनी स्वतः आणि आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत झालेल्या चर्चेदरम्यान, भारतीय जनता पार्टीसोबत आपले फार काळ जमणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. भाजपच्या कारभाराला आणि तेथील भ्रष्टाचाराला कंटाळल्याने 2028 मध्ये आपण महायुतीतून बाहेर पडणार असून, एकत्र आल्याशिवाय आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही, असे अजित पवार यांनी म्हटल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनीही यापूर्वी एक महत्त्वाचे विधान केले होते. सध्या विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नसली, तरी अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी रोजीच दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले असते आणि तशी कल्पना त्यांनी आपल्याला दिली होती, असे तटकरे यांनी सांगितले होते.

दरम्यान, शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आता विकास लवांडे यांनी केलेल्या या नवीन दाव्यामुळे या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.








