पुणे : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता दिवाळीपूर्वीच पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता. या मदतीमुळे महिलांना दिवाळीच्या खर्चासाठी मोठा दिलासा मिळाला. आता नोव्हेंबर महिन्याचे दोन आठवडे संपले असले तरी, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी ही बैठक पार पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. जर 25 नोव्हेंबरपर्यंत यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी झाला, तर 28 ते 30 नोव्हेंबरच्या दरम्यान टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाऊ शकतात.

मात्र, कोणत्याही कारणामुळे नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत ही रक्कम जमा झाली नाही, तर डिसेंबर महिन्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर काय निर्णय होतो, याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागून राहिले आहे.








