पिंपरी, (पुणे) : चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडेबोल सुनावले आहे. शहरात राजकीय कार्यक्रम असताना पत्रकारांना त्या नेत्यांपर्यंत पोहचू दिले जात नाही. त्यांना लांब ठेवलं जात होतं. गेल्या आठवड्यामध्ये पिंपरीत झालेल्या एका कार्यक्रमात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनयकुमार चौबे यांना सांगितले होते.
त्यानंतर पुन्हा आज इतर अधिकाऱ्यांनी पत्रकारांना नेत्यांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्व माध्यमांच्या पत्रकारांनी अजित पवार यांना याबाबत प्रश्न विचारत पोलिसांकडून पत्रकारांना का अडवलं जात आहे? अशी विचारणा केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना बोलवून खडे बोल सुनावले. त्यांनी विनय कुमार चौबे यांना चांगलेच फैलावर घेतले. चिंचवडमधील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात महानगर पालिकेच्या कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते.
दरम्यान, कोणताही मोठा नेता शहरामध्ये आला की मोठा पोलीस बंदोबस्त ठेवत पत्रकारांना नेत्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. यामुळे पत्रकारांनी पिंपरी-चिंचवड पोलीस यांची आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली. यावेळी अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना बोलवून घेत खडेबोल सुनावले.
यापूर्वीही पोलिसांना दिल्या होत्या सूचना
यापूर्वीही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. तरीही आज पोलिसांनी अजित पवार यांच्याकडे पत्रकार जात असताना त्यांची अडवणूक केली. त्यामुळे अखेर पत्रकारांनी अजित पवार यांच्याकडे पोलिसांची तक्रार केली आणि अजित पवार यांनी चौबे यांना खडेबोल सुनावले.
नेमकं अजित पवार काय म्हणाले?
बंदोबस्तामुळे तुमचे लोक पत्रकारांना पुढे येऊ देत नाहीत. पत्रकारांना पुढे येऊ दिलं पाहिजे, त्यांना थांबवू नये. आता असं होणार नाही याची काळजी घ्या. सर्व पक्षीय नेते आल्यास त्यांना त्यांचं काम करू द्या. त्यांच्याशी बोलायचं की नाही हे आमचा अधिकार आहे. असं अजित पवार म्हणाले.