Ajit Pawar : नागपूर : हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणासह अनेक मुद्दे तापले आहेत. त्यातच काल बुधवारी विधान परिषदेत चर्चा सुरू असताना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप संख्या वाढवण्याची गरज असल्याच सतेज पाटील यांनी म्हटलं. त्यावर अजितदादांनी दिलेल्या उत्तरावर सभागृहातील सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. सर्वच स्तरातून अजित पवारांच्या वक्तव्याचा निशेध केला जात आहे. “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?”, असे वादग्रस्त विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. हा वाद वाढतच चालल्याचे पाहून उपमुख्यमंत्री पवार यांनी आज आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.
अजितदादांकडून दिलगिरी व्यक्त
आज, गुरुवारी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. पीएचडीबाबत मी जे बोललो त्याचा विपर्यास करण्यात आला. मी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, काही संशोधक नेत्यांवर पीएचडी करताहेत, असे होऊ नये. पीएचडी करताना विषयाचे गांभीर्य असायला हवे, असेही अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. अशातच आमदार सतेज पाटील विधान परिषदेत म्हणाले, “सारथीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पीएचडी करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. परंतु केवळ २०० विद्यार्थ्यांनाच ही शिष्यवृत्ती दिली जाईल, असा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. ही संख्या वाढवण्यात यावी. सतेज पाटील यांची मागणी ऐकताच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “पीएचडी करून ही पोरं काय दिवे लावणार आहेत?” अजित पवारांच्या या धक्कादायक वक्तव्याचं सतेज पाटलांसह अनेकांना आश्चर्य वाटलं.