air pollution : ठाणे : मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील हवेचा स्तर खालावत जात आहे. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्त्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रयत्नांना यश येत नसल्याचे चित्र आहे. वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलींचे कठोर पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र शहरांतील महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या उपाययोजना तोकड्या पडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले काही दिवस बदलापूर आणि उल्हासनगर शहरांतील हवा अतिवाईट स्तरावर नोंदली जात आहे, तर ठाण्यासह इतर शहरांतील हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदवलेल्या आकडेवारीत हवा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर नोंदला गेला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उल्हासनगर आणि बदलापूर शहरांतील हवेचा दर्जा वाईट असल्याचे दिसून आले. १ डिसेंबरला उल्हासनगरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २४९ इतका, तर बदलापूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २३६ होता. त्यानंतर ६ डिसेंबरला उल्हासनगरचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ इतका होता. त्या तुलनेत ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली शहरांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित असा नोंद होत आहे.
काही दिवसांपूर्वी बांधकाम व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. रस्तेही धुण्यात आले असून शहरात आदेशापूर्वीच धुलिकण रोखण्यासाठी तुषार फवारणी यंत्रणा कार्यरत आहे. रस्तेही धुतले जात आहेत. शहरात काही विकासकामेही सुरू आहेत. त्यामुळे काही भागांत रस्ते खोदले आहेत.