अहमदनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुलीवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. या घटनांमुळे मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता राहुरीतील आश्रमशाळेतुन धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्रमशाळेत चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींशी नराधम शिक्षकाने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. शिक्षक- विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याच्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी येथील अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करणा-या शिक्षकाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गणेश खांडवे असं या शिक्षकाचे नाव आहे. त्याच्यावर याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाने अगोदरही असा प्रकार केल्याची चर्चा असून तेव्हा प्रकरण मिटवण्यात आलं.मात्र पुन्हा हा नराधम शिक्षक अल्पवयीन मुलींच्या अजानतेपणाचा फायदा घेत त्यांच्याशी अश्लील चाळे करत होता. मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून आणखी काही जणींची तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पीडित मुलीच्या आईने केली
दरम्यान रात्री गुन्हा दाखल होण्यापूर्वीच पसार झालेल्या गणेश खांडवे यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या असून आज कोर्टात हजर केले जाणार आहे.या शिक्षकाच्या विरोधात गावामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकाच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांच्याकडून करण्यात येत आहे.