पुणे : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भात लावणीसाठी आवश्यक असलेला पुरेसा पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी आता भात लावणीच्या कामात पूर्णपणे मग्न झाले आहेत.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात शेतीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जुलै अखेरपर्यंत भात लावणीची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र शेतात राबत आहेत. महिलांसह पुरुषही मोठ्या उत्साहात लावणीच्या कामात सहभागी होत असून ग्रामीण भागात सध्या शेतीची लगबग पाहायला मिळत आहे.

शेतात चिखल करून पारंपरिक पद्धतीने भाताची रोपे लावताना ठिकठिकाणी भलरी गीतांचे स्वर घुमत आहेत. लावणी करताना उत्साह टिकून राहावा, एकमेकांना स्फूर्ती मिळावी आणि कामाचा थकवा जाणवू नये यासाठी शेतकरी समूहाने पारंपरिक भलरीची गाणी गात भात लावणी करत असल्याचे मनमोहक चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

भोर तालुक्यातील गावागावांतील शेत, बांध आणि पाणथळ शिवारात सध्या भलरी गीतांचा मंजुळ नाद घुमत असून पावसाळ्यातील ग्रामीण संस्कृतीचे सुंदर दर्शन घडत आहे. शेती आणि लोकपरंपरेचा हा संगम भोर तालुक्याच्या ग्रामीण जीवनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करत आहे.







