पुणे, ता. 05 : हडपसर पोलीस ठाण्याच्या हदीतील मगरपट्टा सिटी परिसरात मानसिक विकलांग महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिरुद्ध सुभाष गांधी यांच्या न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे हा निकाल दिला. अशी माहिती आरोपी प्रतीक हनुमंत जगताप यांच्यातर्फे देण्यात आलेले ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी दिली.

पंकज जगमोहन कटियार, ओंकार कैलास भिसे, सूरज जनार्दन माने, आकाश विलास सूर्यवंशी, प्रतीक हनुमंत जगताप, शुभम दत्तात्रय जाधव आणि अनिल मोहन आगलावे अशी निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात फिर्यादी ही पीडित महिलेची भावजय होती. पीडिता तिच्या भावजयसोबत मगरपट्टा सिटी परिसरात राहत होती. पिडीत महिलेवर आरोपी यांनी वेगवेगळ्या ठिकाणी 7 ते 8 सोसायटीच्या टेरेस वर, पीडिताच्या घरी, फोरव्हीलर मध्ये अशा अनेक जागी सामूहिक बलात्कार केले होते. याबाबत एप्रिल 2018 मध्ये पीडितेने आपल्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती भावजयला दिल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान यामध्ये सात आरोपींना अटक करण्यात आली होती.

तपासात पीडितेने आरोपींची ओळख पटविल्याचे, तसेच तिचा जबाब दंड प्रक्रिया संहितेच्या कलम 164 अन्वये नोंदविण्यात आल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. पीडितेने आरोपींची रेखाचित्रे काढून दिल्याचेही तपासात समोर आले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण 18 साक्षीदार तपासण्यात आले.
मात्र, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार केल्यानंतर न्यायालयाने आरोपींवरील आरोप सिद्ध होत नसल्याचे नमूद केले. पीडिता मध्यम स्वरूपाची मानसिक विकलांग व्यक्ती असल्याचे सिद्ध करण्यात फिर्यादी पक्ष अपयशी ठरला, तसेच वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुराव्यांतून आरोपांना अपेक्षित पुष्टी मिळत नसल्याचे न्यायालयाच्या निष्कर्षात नमूद करण्यात आले. न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे फिर्यादी पक्ष आरोपींवरील आरोप संशयाच्या पलीकडे सिद्ध करू शकला नसल्याचे स्पष्ट करत सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी प्रतीक हनुमंत जगताप तर्फे ॲड. जितेंद्र अशोक जानापुरकर यांनी केस चालवली तसेच साक्षीदारांचे उलटतपास घेऊन अंतिम युक्तिवाद करीत न्यायालयीन कामकाज पाहिले. यावेळी ॲड. मयूर चौधरी, ॲड. स्वप्नील दाभाडे आणि ॲड. ऋषिकेश पाटील यांनी त्यांना सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे ॲड. श्रीमती ब्रम्हे यांनी अंतिम युक्तिवाद केला.







