सांगली : ईश्वरपूर परिसरात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थिनीला लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्या इच्छेविरुद्ध दोघांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मूळची सातारा जिल्ह्यातील असून, सध्या ईश्वरपूर येथे राहून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. शार्दुल पाटील (वय २१, रा. रेठरेधरण, ता. वाळवा) आणि सचिन पाटील (रा. ईश्वरपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. संशयितांनी तरुणीला ईश्वरपूर-कामेरी रस्त्यावरील एका लॉजवर नेले. तेथे तिला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानंतर दोघांनी तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली तसेच मारहाण केल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. घटनेनंतर तरुणीने ईश्वरपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सामूहिक बलात्कारासह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत एका संशयिताला ताब्यात घेतले. शार्दुल पाटील याला अटक करण्यात आली असून, सचिन पाटील याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची नेमकी पार्श्वभूमी, पीडित तरुणीची आरोपींशी ओळख आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणातील पुढील तपास ईश्वरपूर पोलीस करीत आहेत.







