छत्रपती संभाजीनगर : पैठणचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे माजी संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत सोनाजी घोडके यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पैठण तालुक्यातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चंद्रकांत घोडके हे सुरुवातीपासूनच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते.

चंद्रकांत घोडके यांनी पैठणच्या राजकारणात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय वाटचाल केली. आमदार म्हणून काम करताना त्यांनी पैठण तालुक्यातील विविध प्रश्न विधानसभेत मांडले. तसेच सामाजिक आणि विकासात्मक कामांमध्येही त्यांचे योगदान राहिले.

राजकारणासोबतच सहकार क्षेत्रातही चंद्रकांत घोडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शरद सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी त्याच्या विकासासाठी प्रयत्न केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना ‘सहकार महर्षी’ म्हणूनही ओळखले जात होते.

घोडके यांच्या निधनाने पैठण तालुक्याने ज्येष्ठ राजकीय नेतृत्व गमावले असून, राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
चंद्रकांत घोडके यांच्या पार्थिवावर मंगळवारी, ६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता पैठण येथील सिद्धेश्वर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.







