बार्शी : हक्काच्या योजनांसाठीही प्रशासनाकडे वारंवार चकरा टाकाव्या लागतात. तरीही टाळाटाळ नशिबी येते. या पार्श्वभूमीवर गुळपोळीचे (ता. बार्शी) पोलीस पाटील व स्वस्त धान्य वितरण केंद्राचे वितरक बाळकृष्ण पिसे व त्यांचे सहकारी हे मागील तीन वर्षापासून दिव्यांग व्यक्तींना घरपोहोच रेशनचे साहित्य देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे गुळपोळीसह परिसरात कौतुक होत आहे.
शासनाने दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात साखर, रवा, तेल व चनादाळ वाटपास सुरवात केली आहे. प्रत्येकी एक किलो असलेल्या या वस्तू शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून वाटप सुरु केले होते. यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून बाळकृष्ण पिसे हे अपंग आणि हालचाल करू न शकणा-या दिव्यांगांना घरपोहोच रेशन देत आहेत. यावेळी पोलीस पाटील व वितरक बाळकृष्ण पिसे, अंकुश दळवे, सुनील चौधरी आदि उपस्थित होते.
याबाबत बोलताना पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे म्हणाले, “गावातील रेशन दुकान स्वच्छ सुंदर व ISO नामांकन असून रेशन दुकानाचे काम हे शासनाने ठरवून दिलेल्या भावाप्रमाणे दिले जाते. (गहु-२ रु व तांदुळ-३ रु) तसेच केंद्र शासनाचे गरीब कल्याण योजनेचे मोफत धान्य सर्व प्राधान्य लाभार्थी कुटुंबांना वेळेत दिले जाते. परंतु सध्या केशरी कार्डधारकांकडून खोटे आरोप केले जातात की रेशन दुकान दार जास्त पैसे घेतो असे खोटे आरोप होत असल्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल नाराजी व्यक्त केली असून, काही नागरिकांनी स्वःताच्या स्वार्थासाठी आरोप केले आहेत. पिवळ्या कार्डधारकाची काही ही तक्रार नाही तरी प्रशासनाला विनंती आहे की गावात येवून प्राधान्य लाभार्थीची चौकशी करावी.”