लोणी काळभोर : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक बी. टी. लावंड यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आता तीन सदस्यीय शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासकीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. असे आदेश पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे यांनी दिला आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा व संरक्षण व्यवस्था बँकेकडेच कारखान्याच्या विषयावर पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली २८ सप्टेंबर रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये बँकेचे सतीश सांळुखे व व्यवस्थापक एम. एम. अहुजा उपस्थित होते.
या बैठकीत ३१ मार्च २०२२ अखेर लेखापरीक्षण कामकाजाच्या दृष्टीने दप्तर पूर्ण करून कारखान्याचे माजी अवसायक सतीश साळुंखे यांच्यामार्फत लेखापरीक्षण कामकाज पूर्ण करून घेण्याचे ठरले. तसेच कारखान्याचे चल व अचल मालमत्ता ही सिक्युरिटीटायझेशन अॅक्टप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रत्यक्ष ताब्यात असून, हा ताबा यापुढेही कायम ठेवून त्याबाबतच्या संरक्षणाची व्यवस्था बँकेने कायम ठेवावी. तसेच दप्तरी कामकाज हे प्रशासकीय मंडळ पाहील, असे ठरले आहे. त्यानुसार उभयपक्षी प्रशासकीय मंडळ व राज्य बँकेत समन्वय करण्याचे ठरले आहे.
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सहकारी संस्थांचे उपनिबंधक बी. टी. लावंड यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सहायक व्यवस्थापक आणि कारखान्याचे तत्कालीन अवसायक सतीश साळुंखे यांनी कारखान्याच्या मालमत्तेचा, आर्थिक बाबींच्या कागदपत्रांसह रीतसर पदभार लावंड यांना आदेशान्वये कळवूनही दिला नाही.
याचबरोबर यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मार्च २०२२ अखेर लेखापरीक्षण पूर्ण नसल्यामुळे, तसेच दप्तर व मालमत्ता यांचा ताबा साळुंके यांच्याकडून मिळाला नाही.या कारणामुळे लावंड यांना प्रशासकीय कामकाज करता आलेले नाही. त्यामुळे प्रशासक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करण्याचे पत्र लावंड यांनी डोईफोडे यांना दिले होते. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.
दरम्यान, यशवंत सहकारी साखर कारखान्यावरील तीन सदस्यीय प्रशासकीय समितीमध्ये पुण्याचे प्रादेशिक साखर उपसंचालक संजय गोंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सहकारी संस्थांचे (साखर) द्वितीय विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख आणि सातारा येथील सहकारी संस्थांचे द्वितीय लेखापरीक्षक द्वारकानाथ एन. पवार यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. असे आदेश पुणे प्रादेशिक साखर सह संचालक धनंजय डोईफोडे यांनी दिले आहेत.