पुणे : गेल्या काही दिवसांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरक्षेशी संबंधित अनेक घटना घडल्या आहेत. नुकतीच विद्यार्थ्यांनीं समोर अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता विद्यापीठ प्रशासनाला जाग आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने ‘सुरक्षा हेल्पलाइन’ उपक्रम सुरू केला असून, त्याद्वारे विद्यापीठ परिसरातील कोणतीही सुरक्षेसंबंधी तक्रार थेट नोंदवता येणार आहे. ही सेवा विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यापीठात येणाऱ्या अभ्यागतांसाठीही खुली आहे.
पुणे विद्यापीठ प्रशासनाच्या सुरक्षा हेल्पलाइन उपक्रमांतर्गत ०२०-४८५५३३८३ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. या क्रमांकावर कोणतीही सुरक्षेसंबंधी तक्रार, संशयास्पद हालचाल किंवा अन्य अडचण असल्यास त्वरित संपर्क करता येणार आहे. यामुळे वेळेत कारवाई होण्यास मदत होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच विद्यापीठात शिकणाऱ्या तीन विद्यार्थिनी जेवण करण्यासाठी जात असताना तरुणाने त्यांच्यासमोर अश्लील कृत्य करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी आरोपी अनिश गायकवाड या तरुणाला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. त्यांच्या विरोधात विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घडल्या प्रकरणानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून सुरक्षितेसाठी विद्यापीठ प्रशासनाने आता सुरक्षा हेल्पलाइन उपक्रम सुरू केला आहे.
दरम्यान विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, या हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची गंभीर दखल घेतली जाणार असून, संबंधित विभागांकडून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल. हे पाऊल सुरक्षेच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.