उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे 2016 ला झालेल्या अमोल कोतवाल याच्या खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. पूणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या कोर्टाने हा निकाल दिला आहे, अशी माहिती आरोपीचे वकील अँड. नितीन भालेराव यांनी दिली.
राजेश लोंढे, महादेव अदलिंगे, अक्षय रेडे अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर गुन्ह्यातील चौथा आरोपी स्वागत खैरे मयत झाल्याने त्याला वगळून 3 आरोपींच्या विरुद्ध खटला चालवला गेला होता. याप्रकरणी मयत अमोल कोतवाल यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, 21 मे 2016 रोजी मयत अमोल कोतवाल याचा आरोपी राजेश लोंढे याचे बरोबर बॅनर फडण्यावरून वाद झाला होता. या कारणावरून मनात राग धरून चार आरोपींनी मयत अमोल कोतवालचा खून केला होता. अशी फिर्याद लोणी काळभोर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपितांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
गुन्ह्यातील चौथा आरोपी, स्वागत खैरे, हा उरुळी कांचन येथील संतोष जगताप खून प्रकरणात मयत झाल्याने त्याला वगळून 3 आरोपींच्या विरुद्ध खटला चालवला होता. सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले होते. आरोपी तर्फे अँड. विपुल दुशिंग आणि अँड. नितीन भालेराव यांनी युक्तिवाद केला.
दरम्यान, आरोपी व सरकार पक्षाचा युक्तिवाद ऐकून पूणे येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एल. टिकले यांच्या कोर्टाने आरोपी विरुद्ध सबळ पुरावा नसल्याने सर्व आरोपीना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले आहे. या कामी अँड. मयूर चौधरी यांनी मदत केली.