लोणी काळभोर, (पुणे) : घरगुती वादातून पत्नीच्या डोक्यात दगड मारून रेल्वेने पळून गेलेल्या फरार आरोपी पतीला गुन्हे शाखा युनिट -6 च्या पोलिसांनी मनमाड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेलते आहे. रविवारी (ता. 22) वाघोली परिसरातील केसनंद फाटा परिसरात ही घटना घडली होती.
कैलास गणपत जाधव, (वय 44, रा. केसनंद फाटा, वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर पद्मिनी कैलास जाधव, (वय 40) असे जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. पद्मिनी जाधव यांची प्रकृती अद्याप गंभीर असून बेशुद्ध अवस्थेत ससून रुग्णालय येथे उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली गावच्या हद्दीत केसनंद फाटा येथे कैलास जाधव याने पत्नी पद्मिनी जाधव यांना घरगुती वादातून डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले होते. त्यानुसार वाघोली पोलीस ठाण्यात जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी हा पळून गेला होता. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन युनिट 6 पथक तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले.
सदर गुन्ह्यात केलेल्या तांत्रिक तपासावरून नमूद आरोपी हा पुणे स्टेशन येथून झेलम एक्सप्रेसने रवाना झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट 6 चे एक पथक वरिष्ठांचे परवानगीने तात्काळ रवाना करण्यात आले. नमूद आरोपीस त्यानंतर लोहमार्ग पोलिस, मनमाड रेल्वे स्टेशन यांच्याशी समन्वय साधून मनमाड रेल्वे स्थानक येथे झेलम एक्सप्रेस ही ट्रेन तपासून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतास पुढील कायदेशीर कारवाईकामी वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, संभाजी सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, गणेश डोंगरे, बाळासाहेब तनपूरे, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे यांनी केली आहे.