पुणे, : घराच्या वादातून हडपसर येथील वैदूवाडी परिसरात लोखंडी कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. विलास बापू खिलारे असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे (शिवाजीनगर) सत्र न्यायालयाने अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. क्षीरसागर यांनी हे आदेश पारित केले आहेत. अशी माहिती आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापूरकर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर येथील वैदूवाडी, मार्कंडेयनगर परिसरातील ‘रिद्धी सिद्धी’ बिल्डिंगखालील पूनम प्रोव्हिजन दुकानासमोर फिर्यादी विशाल जाधव हे 8 फेब्रुवारी 2019 ला सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचे मित्र सोमनाथ शिंदे आणि चुलत भाऊ तुकाराम शिंदे यांच्यासोबत गप्पा मारत उभे होते.

त्यावेळी वस्तीत राहणारे आरोपी विलास खिलारेआणि त्यांचा मुलगा शुभम खिलारे हे तेथे आले. पूर्वीच्या घराच्या वादाचा राग मनात धरून शुभम याने फिर्यादीस शिवीगाळ करत हातातील धारदार शस्त्राने (कोयत्याने) फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. यावेळी विलास खिलारे यांनी “याला जिवंत मारून टाका, सोडू नका” असे चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप होता.
दुसरा वार फिर्यादीने डाव्या हाताने अडवल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी फिर्यादी विशाल जाधव यांच्या तक्रारीवरून हडपसर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ५०४, ३४, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. तरळगट्टी यांनी बाजू मांडली, तर ॲड. कावेडिया यांनी आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी अंतिम युक्तिवाद करत विविध ‘केस लॉ’ (न्यायालयीन दाखले) न्यायालयात सादर केले. या केसमध्ये सरकारी पक्षाने एकूण 07साक्षीदार तपासले.
मात्र, आरोपीचे वकील ॲड. जितेंद्र अशोक जानापूरकर यांनी सरकारी पक्षाच्या सर्व महत्त्वाच्या साक्षीदारांची सखोल उलटतपासणी घेतली. घटनेतील विसंगती, पुराव्यांमधील त्रुटी आणि आरोपीचा थेट सहभाग सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला आलेले अपयश ॲड. जानापूरकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी आरोपीच्या निर्दोष मुक्ततेसाठी जोरदार अंतिम युक्तिवाद केला.
दरम्यान, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब आणि उपलब्ध कागदपत्रे यांचा बारकाईने विचार करून, आरोपी विलास खिलारे यांच्याविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा कोणताही सबळ व ठोस पुरावा सिद्ध न झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आर. के. क्षीरसागर यांनी आरोपीची सर्व गुन्ह्यांतून निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश दिले. या खटल्यात आरोपीच्या बचावासाठी ॲड. स्वप्नील दाभाडे आणि ॲड. ऋषिकेश पाटील यांनी ॲड. जानापूरकर यांना कायदेशीर सहकार्य केले.






