पुणे : अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये करणाऱ्या भोंदू अशोक खरातलां आता समता नागरी पतसंस्थेतील बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातही मोठा दणका बसला आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या खरातला राहाता न्यायालयाने 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. शिर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

मुंबईतील व्यावसायिक दिनेश परब यांनी या प्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अशोक खरात आणि पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकाने संगनमत करून आपल्या नावाने बनावट खाते उघडल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले. या खात्यातून सुमारे 2 कोटी 40 लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार करण्यात आले. विशेष म्हणजे, या अर्जावर बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या आणि ज्या साक्षीदारांची नावे दिली होती, त्यांना तक्रारदाराने कधी पाहिलेच नव्हते. तपासात या खात्याला जोडलेला मोबाईल क्रमांक आणि वारसदार म्हणून दिलेले नाव अशोक खरातचेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातने शिर्डी शाखेत आपल्या भक्तांच्या नावाने 57 व्यक्तींची जवळपास 100 बनावट बँक खाती उघडली होती. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या शासकीय ओळखपत्रांचा गैरवापर करण्यात आला. या बहुतांश खात्यांमध्ये वारसदार म्हणून खरातचेच नाव नोंदवलेले होते. या सर्व खात्यांच्या माध्यमातून 60 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची आर्थिक उलाढाल झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिस तपासात व्यक्त करण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य खाती उघडण्यासाठी पतसंस्थेतील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचा संशय विशेष तपास पथकाने (SIT) व्यक्त केला आहे. याप्रकरणी शिर्डीच्या शाखा व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पतसंस्थेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या पोलिस या सर्व आर्थिक व्यवहारांची साखळी आणि इतर संशयितांचा शोध घेत आहेत







