शिरूर : रांजणगाव सांडस(ता.शिरूर)येथील यात्रेच्या छबिन्यामध्ये एका तरुणाकडून पुतण्याला धक्का लागल्यामुळे व तोच तरुण नात्यातील मुलीशी जवळीक साधून गप्पा मारतो या कारणामुळे तरुणावर सत्तूराने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले.करण राजेंद्र भंडलकर(वय-१९, रा.रांजणगाव सांडस,ता.शिरूर जि.पुणे)असे सत्तूराने वार केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रांजणगाव सांडस(ता.शिरूर) येथील भैरवनाथ देवाच्या यात्रेतील छबिन्यात ही घटना घडली.या घटनेमध्ये संदीप गोरख लोखंडे (वय-३२,रा.रांजणगाव सांडस, लोखंडेवस्ती,ता.शिरूर,जि.पुणे)या तरुणावर आरोपीने सत्तूराने खांद्यावर व कपाळावर वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.
या घटनेची शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,रविवारी (ता.१३)रात्री रांजणगाव सांडस (ता.शिरूर,जि.पुणे)येथे भैरवनाथ देवाच्या यात्रेचा छबीना मिरवणूक सुरू असताना,करण राजेंद्र भंडलकर याने छबीना मिरवणूकीमध्ये त्याच्या पुतण्याला धक्का लागल्यामुळे व नात्यातील एका मुलीशी संदीप लोखंडे हा तरुण जवळीक साधून गप्पा मारतो या कारणावरून त्याचा राग मनात धरून करण भंडलकर याने “तू काय मोठा डॉन आहेस का? तू आमच्या वस्तीतील मुलींना त्रास देत असतो,थांब आता तुझ्याकडे बघतोच” असे म्हणून शिवीगाळ,दमदाटी करून दीपक लोखंडे याच्यावर सत्तूराने हाताच्या खांद्यावर,कपाळावर वार केले.त्यामुळे दीपक लोखंडे याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी करण राजेंद्र भंडलकर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी करण भंडलकर हा फरार असून,पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी भोते करीत आहेत.