थेऊर, (पुणे) : थेऊर – केसनंद मार्गावर थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीजवळील वळणावर कंटेनर व दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एक तरुण जखमी झाला आहे. सोमवारी (ता. 02) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
या अपघातात दादा दत्तू शिंदे (वय-44, रा. काष्टी श्रीगोंदा जि. अहमदनगर) मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर या कांतीलाल बबन पांढरे (36, रा. राजेगाव, ता. दौंड असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादा शिंदे व कांतीलाल पांढरे हे केसनंद येथे नातेवाईकांकडे आले होते. सोमवारी सकाळी मित्राच्या घरून मूळ गावी दुचाकीवर पुणे – सोलापूर महामार्गावरून जाण्यासाठी निघाले होते.
थेऊर – केसनंद रस्त्यावर जाताना थेऊरच्या बाजूकडून वाघोलीच्या बाजूने एक कंटेनर निघाला होता. यावेळी थेऊर येथील स्मशानभूमी परिसरात असलेल्या वळणावर दादा शिंदे यांना अंदाज न आल्याने शिंदे चालवत असलेल्या दुचाकीवरील ताबा सुटला व समोरून आलेल्या कंटेनरने जोरात धडक दिली.
दरम्यान, घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे, पोलीस हवालदार महेश कर्वे, पोलीस शिपाई राहुल कर्डिले, कदम, विशाल बनकर, आदींनी धाव घेऊन दादा शिंदे व कांतीलाल पांढरे यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच दादा शिंदे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.