विशाल कदम
उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा प्रवीण शिवाजी कांचन हा पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल राजकीय, सामाजिक व सर्व स्तरातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा जानेवारी २०२२ महिन्यात झाली होती. त्यानंतर मुख्यपरीक्षा जुलै महिन्यात झाली. या दोन्ही परीक्षेत ४०० पैकी ३३९ गुण मिळवून प्रवीण कांचन उत्तीर्ण झाले आहेत.
प्रवीण कांचन यांनी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रवीण कांचन हे २०१४ साली महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते विमानगर पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार या पदावर कार्यरत आहेत.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मुले मुली लाखो रुपये भरून क्लास लावतात. प्रवीण कांचन यांनी कोणताही स्पर्धा परीक्षेचा क्लास न लावता घरीच अभ्यास केला. त्यांच्या या यशामुळे परिसरातील युवकांना प्रेरणा मिळाली आहे. या यशासाठी कांचन यांना विमानतळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंढे, डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलीस निरीक्षक भरत जाधव व मुंबई येथील पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले.
दरम्यान, प्रवीण कांचन हे अवघ्या ५ वर्षाचे असतानाच, त्यांचे वडील शिवाजीराव कांचन यांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रवीणची आई जनाबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. मात्र, प्रवीणने वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही जिद्दीने प्रयत्न करून यशाला गवसणी घातली. त्याच्या जिद्दीचे पूर्व हवेलीसह परिसरात कौतुक होत आहे.
यावेळी बोलताना प्रवीण कांचन म्हणाले कि, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते, ध्येय नक्कीच गाठता येते. त्यांमुळे विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता त्याला प्रयत्नांच्या परीकाष्टाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते. असे कांचन यांनी सांगितले. तसेच हे यश आई जनाबाई कांचन यांच्या चरणी अर्पण करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.