पुणे : कोल्हापूरहून मुंबई आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे येथील रेल्वे सुविधांचा विस्तार करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, मध्य रेल्वेने विविध तांत्रिक कारणांचा दाखला देत या सर्व मागण्या अमान्य केल्या आहेत.’सह्याद्री एक्स्प्रेस’ सुरू करण्यावर मुंबई स्थानकावर सध्या उन्नतीकरणाचे काम सुरू असल्याचे रेल्वेने म्हटले आहे. हे काम पूर्ण झाल्यावरच प्रस्तावाचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले असले तरी हे काम कधी संपणार याची कोणतीही स्पष्ट मुदत दिलेली नाही.

प्रवासी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत निकम यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठका घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु, रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रवासी संघाने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे.

‘कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस’चा विस्तार मुंबईपर्यंत करण्याची विनंती फेटाळण्यात आली आहे. पुणे-मुंबई मार्गावर आधीच मेल आणि एक्स्प्रेसच्या 65 जोड्या धावत आहेत. तसेच CSMT येथील स्थानकाची क्षमता आणि ही गाडी पुणे-हुबळी वंदे भारतशी जोडलेली असल्याने असा विस्तार शक्य नाही, असे रेल्वेचे म्हणणे आहे.

पनवेल आणि कोल्हापूर या दोन्ही स्थानकांवर टर्मिनलच्या मर्यादा असल्याने नवी गाडी सुरू करता येत नाही, असे सांगण्यात आले. तसेच मुंबई सेंट्रलसाठी नवी रेल्वे सुरू करणे फलाट, पिट लाईन आणि स्टेबलिंग लाईन्सच्या अभावामुळे अशक्य असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले. अहमदाबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस ही गाडी वसई रोडमार्गे आधीच उपलब्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकंदरीत, सर्वच मागण्यांना रेल्वेने नकार दिल्याने कोल्हापुरातील प्रवाशांचा हिरमोड झाला असून, आगामी काळात याप्रश्नी आंदोलन छेडण्याची तयारी प्रवासी संघटनेने केली आहे.







