पिंपरी-चिंचवड : शहरात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोन संशयित चोरट्यांना ताब्यात घेत सहा गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. भक्ती-शक्ती चौकातील पीएमपीएमएल बसथांब्याजवळ संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडील बॅगेची झडती घेतली असता घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.

सोमवारी (29 सप्टेंबर) गुन्हे शाखा युनिट एकचे पथक पिंपरी-चिंचवड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी भक्ती-शक्ती चौकातील बसथांब्याजवळ दोन जण संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्यांच्या बॅगेची तपासणी केली. बॅगेत मोठा स्क्रूड्रायव्हर, हातोडा, छन्नी आणि करवत यांसारखे साहित्य आढळून आले.

विकास उर्फ ‘जंगल्या’ मिलिंद कांबळे (वय 35, रा. पिंपरी) आणि गौतम धर्मलिंगम नाडार (वय 28, रा. राजगुरूनगर, खेड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात केलेल्या विविध चोरीच्या घटनांची माहिती समोर आली.

पोलिसांच्या तपासानुसार, काळेवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घरफोडी, तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि संत तुकारामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दुचाकी चोरीचे गुन्हे अशा एकूण सहा गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या दुचाक्या आणि चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी काळेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







