हडपसर, (पुणे) : सहा महिन्यांपासून मेंटेनन्स न भरल्याचे कारण विचारल्याने सदस्याने सोसायटीच्या चेअरमनच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांजरी येथील झेड कॉर्नरमधील रॉयल रेसिडेन्सी सोसायटीत रविवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमरास हि घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद ओव्हाळ असे मारहाण झालेल्या चेअरमनचे नाव आहे. तर कामील शेख (रा. रॉयल रेसिडेन्सी, झेड कॉर्नर, मांजरी) व रियाज पठाण अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी ओव्हाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद ओव्हाळ हे गेली सात वर्षे रॉयल रेसिडेन्सी येथे राहत असून, मागील दोन वर्षांपासून सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीच मेंटेनन्स गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. संबंधित इमारत रियाज पठाण यांनी 2017 मध्ये बांधली असून, त्यातील एक फ्लॅट कामील शेखला राहण्यासाठी देण्यात आला आहे.
रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ओव्हाळ हे घरी जात असताना इमारतीच्या गेटसमोर त्यांची भेट कामील शेख आणि त्याच्या मेहुण्याशी झाली. तेव्हा ओव्हाळ यांनी थकीत मेंटेनन्सबाबत विचारणा केली असता वाद निर्माण झाला. वाद विकोपाला जाताच रस्त्यावर पडलेला दगड उचलून ओव्हाळ यांच्या डोक्यात मारण्यात आला.
दरम्यान, घटनेनंतर ओव्हाळ यांच्या घरातील सदस्य बाहेर आले. त्यांनी जाब विचारल्यावर त्यांनाही दोघांनी धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जखमी प्रमोद ओव्हाळ यांना उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील तपास हडपसर पोलिस करीत आहेत.