उरुळी कांचन, (पुणे) : वयोवृद्ध इसमास अरेरावी करू नका म्हटल्याच्या कारणावरून दोघांनी उरुळी कांचन येथील एका हॉटेल व्यावसायिकाला काचेच्या बाटलीने व खुर्चीने बेदम मारहाण केली आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बायफ रोड, तांबे वस्ती परिसरात रविवारी (ता. 29) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
साहिल कचरू चव्हाण, व यश उर्फ वामन गजेंद्र मोहिते (रा. दोघेही, गोळे वस्ती, उरूळी कांचन ता. हवेली) अशी मारहाण केलेल्या दोघांची नावे आहेत. तर सतीश धर्मा बारंगुळे (वय – 49), व्यवसाय हॉटेल रा. बायफ रोड, तांबे वस्ती) असे मारहाण झालेल्या हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे. बारंगुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलिस ठाण्यात वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश बारंगुळे यांचे तांबे वस्ती परिसरात हॉटेल आहे. हॉटेल समोर उभे असलेल्या वयोवृद्ध इसमास साहिल चव्हाण व यश उर्फ वामन मोहिते हे अरेरावीची भाषा करीत होते. यावेळी फिर्यादी यांनी वयोवृद्ध इसम आहे. त्याला आरेरावी करु नका असे म्हटले. असे म्हटल्याच्या कारणावरून साहिल चव्हाण व यश मोहिते या दोघांनी शिवीगाळ दमदाटी करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, हॉटेलमध्ये असलेली प्लास्टिकची खुर्ची डोक्यात मारली. तसेच काचेची बाटलीने दोन्ही हातावर दुखापत करून जखमी केले आहे. सतीश बारंगुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार साहिल चव्हाण व यश मोहिते यांच्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.