मुंबई: मुंबई आणि आसपासच्या परिसरातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मनोरंजन विश्वातील काही चेहरे अनैतिक व्यवसायात अडकल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या गिरगाव परिसरात एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा क्राईम ब्रँचच्या युनिट 4 ने पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी एक मराठी चित्रपटांत आघाडीची भूमिका करते, तर दुसरी बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांत दिसते. एका महिला मेकअप आर्टिस्टने या अभिनेत्रींना वेश्याव्यवसायाकडे वळवले होते. माहितीनुसार, एका रात्रीसाठी तब्बल 2 लाख रुपयांचा सौदा (प्रत्येकी 1 लाख रुपये) झाला होता. पोलिसांनी छापा टाकून मेकअप आर्टिस्टला अटक केली आणि पीडित अभिनेत्रींची सुटका केली.

केवळ गिरगावच नव्हे, तर असे सेक्स रॅकेट तस्करी इतर भागातही सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. कल्याण पूर्व येथील एका हॉटेलमध्ये एक ज्येष्ठ महिला वकील स्वतः हे रॅकेट चालवत होती. आर्थिक अडचणीत असलेल्या आणि गरजू मुलींना आमिष दाखवून ही वकील त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत होती. ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करी प्रतिबंधक कक्षाने या मुख्य सूत्रधार वकिलाला अटक केली आहे.
या घटनांमुळे अनैतिक मानवी तस्करीचे काळे वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. गुन्हेगारांचे हे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.







