पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आळंदी येथे कारच्या धडकेत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी 26 वर्षीय डॉक्टर प्रथमेश कोकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, आरोपीला अटक करण्यात आली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोशी-आळंदी रस्त्यावर श्रुतिका मिरासे (वय 2) ही रस्त्याच्या कडेला असताना भरधाव कारने तिला धडक दिली. धडकेनंतर कार तिच्या अंगावरून गेल्याने चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर चालकाने घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्याचा पाठलाग करून चिंबळी फाटा येथे त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी आळंदी पोलिसांनी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, उपलब्ध पुरावे आणि अटकेसंदर्भातील कायदेशीर तरतुदींचा विचार करून आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या निर्णयावरून विविध स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीला अटक का करण्यात आली नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून सखोल चौकशी करावी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे.
या घटनेमुळे मिरासे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.







