दौंड, (पुणे) : दौंड रेल्वे जंक्शनच्या कॅरेज अॅण्डवर्क्स डिपार्टमेंटमधून तब्बल 5 लाख रुपयांची तांब्याची केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही यंत्रणेचे कॅमेरे असतानाही ही चोरी झाली आहे. चोरी होऊन 78 दिवसानंतर एका खासगी सौर ऊर्जा कंपनीचे पर्यवेक्षक श्रीकृष्ण संपते यांनी मंगळवारी (ता. 24) दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दिलीआहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड जंक्शन परिसरात रेल्वेच्या इमारती आणि शेडवर सौर ऊर्जा पॅनेल उभारण्याचे काम एका खासगी कंपनीकडून सुरू आहे. सौर ऊर्जा पॅनेल जोडण्यासाठी तांबे असलेली केबल वापरली जाते. त्या केबलपैकी दौंड रेल्वे हॉस्पिटलच्या पुढे असलेल्या रेल्वे कॅरेज अॅण्ड वर्क्स डिपार्टमेंटमध्ये ठेवण्यात आलेले 12 केबलचे बंडल नऊ ऑक्टोबर रोजी रात्री चोरीला गेले आहेत.
ज्या भागातून केबलचे बंडल चोरीला गेले, तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. मात्र, चोरीच्या दिवशी जेथे केबलचे बंडल ठेवण्यात आले होते. त्या बंडलांच्या पुढे दुरुस्तीसाठी आलेल्या मालगाडीची बोगी असल्याने केबल चित्रीकरणात दिसत नाही. चोरीस गेलेल्या सहा हजार मीटर केबलची मूळ किंमत तब्बल 5 लाख 31 हजार 720 रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास लोहमार्ग पोलिस दलातील हवालदार मनोज साळवे करीत आहेत.