दौंड, (पुणे) : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवगिरेवस्ती येथे एका युवकास मारहाण करत त्याच्या नातेवाइक महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी (ता. 21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवगिरेवस्ती येथे घडली आहे.
अॅलेक्स निक्सन नवगिरे, अनुष निक्सन नवगिरे, जोएल जॉन्सन नवगिरे (सर्व रा. नवगिरेवस्ती, दौंड ता. दौंड) व रूतेश आहळ रा. अहिल्यानगर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय रविकांत जाधव (वय 27, व्यवसाय पेंन्टींग रा. नवगिरेवस्ती दौंड ता. दौंड) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवगिरेवस्ती परिसरात मस्करी केल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी जाधव यांना त्यांच्या राहत्या घरासमोर येऊन लाथाबुक्क्यांनी व लोखंडी पाईपने मारहाण केली. या हल्ल्यात फिर्यादीचे नातेवाईक त्यांना वाचविण्यासाठी आले असता, आरोपी रूतेश आहळ याने त्यांच्या नातेवाइक महिलेसोबत तिचे अंगारील ड्रेस फाडुन तिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले व हाताने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, याप्रकरणी अक्षय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरील चौघांवर दौंड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 118(1), 115(2), 351(2), 352, तसेच कलम 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.