कर्जत : कर्जत शहरात गर्दीने गजबजलेल्या रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अनेक मुख्य रस्त्यांवर आणि गर्दीच्या ठिकाणांवर ‘नायलॉन दोरीचा’ प्रयोग राबवत कर्जतकरांनाच नव्हे तर जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळवून दिला आहे.
कर्जत मधील प्रसिद्ध असलेल्या कापड बाजारातील अस्ताव्यस्त वाहतुकीला नियंत्रणात आणण्यासाठी नायलॉन दोरीचा ‘यादव पॅटर्न’ राबवला आहे.त्यामुळे येथील सर्व व्यापारी बांधवांनी पोलीस निरीक्षक यादव यांचे आभार मानत त्यांचा सन्मान केला आहे.
सणासुदीच्या काळात कर्जत येथील कापड बाजारात मोठी गर्दी असते. त्यामुळे असंख्य अस्ताव्यस्त वाहनांनी हा रस्ता अक्षरशः ठप्प होतो. यावर आजपर्यंत कोणतीही ठोस उपाय योजना झाली नसल्याने हा प्रश्न कायम भेडसावत होता. शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणांवरील वाहतूक नियंत्रणात आणल्याने आता कापड बाजारातील प्रश्न हाती घेत पोलीस निरीक्षक यादव यांनी सर्व व्यापारी बांधवांची बैठक घेतली. तेथील अडचणी समजून घेतल्या.
सर्वांशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर काही प्रमाणात पुढे लावलेली दुकाने पोलिसांनी पाठीमागे घेतली आणि कर्जत पोलिसांनी नायलॉन दोरी रस्त्यावर लावून त्या दोऱ्या लोखंडी खिळ्याने सम अंतरावर कायमच्या बसवल्या आहेत. आता या ठिकाणी नायलॉन दोरीचा प्रयोग करून ही सर्व वाहतून नियंत्रणात आणली आहे. कापड बाजारात सर्व वाहने एकाच रेषेत उभी राहणार असून जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही त्याला आर्थिक दंड तसेच वेळप्रसंगी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
प्रत्येक व्यवसायिकाने आपल्या दुकानासमोर येणारी वाहने पार्किंगमध्ये लावून घेण्याचा आग्रह धरण्याच्या सूचना यादव यांनी केल्या. आलेल्या नागरिकांनाही नियमांचे पालन करण्यासाठी तंबी दिली. आणि विशेष म्हणजे यादवांच्या या नियमावलीचे पालन करण्यासाठी आणि उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी एका महिला होमगार्डची व्यापराऱ्यांच्या मार्फतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी पोलीस कर्मचारी मनोज लातूरकर, बाळासाहेब यादव, नरुटे यांच्यासह पत्रकार व सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.
रस्ता घेणार मोकळा श्वास..!
याबाबत बोलताना कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव म्हणाले, काही प्रमाणात पुढे आलेली दुकाने मागे घेतली आहेत. या रस्त्यावरची गर्दी पाहता वाहतूक नियंत्रणासाठी सम-विषम पार्किंग करणे किंवा आणखी वेगळे प्रयोग करणे शक्य नव्हते त्यामुळे नायलॉन दोरीमुळे एका रेषेत वाहने उभी राहतील. रस्ता मोकळा होईल. कुणाला त्रास होणार नाही. एका रेषेत असलेल्या वाहनांमुळे कर्जत शहराच्या सौंदर्यातही भर पडेल.