लोणी काळभोर (पुणे)- कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडे वस्ती परीसरात घराच्या टेरेसवर बॅडमिंटनचे फुल काढण्यासाठी गेलेली 10 वर्षीय शालेय विध्यार्थीनी टेरेसवरुन गेलेल्या विजेच्या तारांना चिकटल्याने, गंभीररित्या भाजल्याची घटना आज (रविवारी) सायंकाळी साडेसहा वाजनेच्या सुमारास घडली आहे.
भाग्यश्री धनंजय बनसोडे (वय १० वर्षे, रा. घोरपडेवस्ती लेन नंबर ११, कदमवाकवस्ती ता. हवेली) हे त्या भाजलेल्या विध्यार्थीनीचे नाव असुन, तिच्यावर लोणी स्टेशन परीसरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान भाग्यश्री बनसोडे ही तीस टक्क्याहुन अधिक भाजली असल्याची माहिती तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. भाग्यश्री बनसोडे हीची प्रकृती चांगली असुन, तिला उपचारासाठी पुण्यात हलविण्यात येणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ठ केले आहे.
भाग्यश्री बनसोडेचे वडील धनाजी बनसोडे लोणी स्टेशन येथील मालधक्क्यात हमाल असुन, ते घोरपडे वस्ती परीसरात महादेव खंदारे यांच्या बिल्डींगमध्ये भाड्याने राहतात. महादेव खंदारे यांच्या बिल्डींगवरुन विजेच्या तारा गेलेल्या आहेत. बिल्डींग उभी असलेल्या जागेतुन विजेच्या तारा गेलेल्या असल्याने, विज वितरण कंपणीने खंदारे यांनी तारांच्या खाली इमारत बांधु नये. याबाबत लेखी कळवले होते. मात्र खंदारे यांनी विज वितरण कंपणीच्या नोटीशीला झुगारुन इमारत उभारली आहे.
महादेव खंदारे यांनी विज वितरण कंपणीच्या नोटीशीला झुगारुन उभारलेल्या इमारत जवळ कांह मुले बॅडमिंटन खेळत असतांना, बॅडमिंटनचे फुल टेरेसवर गेले. हे फुल काढण्यासाठी भाग्यश्री इमारतीवर गेली होती. टेरेसवर तारांच्या खाली चार फुट उंचीची भित उभारली असल्याने, भाग्यश्री सिडीच्या साह्याने बॅडमिंटनचे फुल काढत असताना, भाग्यश्री विज वाहक तारांच्या संपर्कात आली. यात तिला तारांचा शॉक बसल्याने, सिडीवरुन खाली कोसळली. ही बाब लक्षात येताच, शेजारच्या लोकांनी तात्काळ भाग्यश्रीला उपचारासाठी लोणी स्टेशन येथील खाजगी रुग्णालयात हलविले. लोणी काळभोर पोलिस व विज वितरण कंपणीचे कर्मचारी घटनास्थळी पोचले असुन, अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.