पुणे : शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक शहर, स्मार्ट सीटी आणि आता कॉस्मोपॉलीटियन सीटी या नावानं ओळखलं जाणारं पुणे मागील काही वर्षांपासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं पाहायला मिळालं. गेल्या तीन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. यंदा 2023 मध्ये तब्बल 394 बलात्काराचे गुन्हे समोर आले आहेत. ही आकडेवारी पाहून पुण्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचं दिसून येतं.
वर्षभरात 394 बलात्कार
पुण्यात वर्षभरात 394 गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दिवसाला एका महिलेवर किंवा मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. बहुतांश प्रकरणात आरोपी हे पीडित महिलांच्या परिचयाचे आहेत. थेट वडिल आणि आजोबांकडूनही बलात्कार करण्यात आल्याची प्रकरणं आहेतच. अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे प्रमाणदेखील मोठे आहे. लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्यांच्या तक्रारी जास्त आहेत.
बलात्कारी आरोपीला शिक्षा होत नाही
अनेक प्रकरणांमध्ये बलात्कारी आरोपींना जामीन मंजूर झाल्याचं आपण पाहिलं आहे. त्यांना शिक्षादेखील न झाल्याची अनेक प्रकरणं आपल्या समोर आहे. सगळी प्रकरणं फास्ट ट्रॅक कोर्टात चालत नाही.
लैंगिकतेचं प्रशिक्षण गरजेचं
लैंगिकता प्रशिक्षण आपल्याकडे दिलं जात नाही. या प्रशिक्षणामुळे लिंग समानतेसंदर्भात माहिती मिळते. शाळांमध्ये सध्या हे प्रशिक्षण देणं फार गरजेचं झालं आहे. मुलांना माहित नसल्यामुळे अनेकदा कुतूहल निर्माण होते. त्यामुळे मुलं व्हिडीओ किंवा सोशल मीडियापाहून आपली विचारधारा तयार करत असतात.
ग्रामीण भागात बलात्काराचं प्रमाण कमी
ग्रामीण आणि शहरी भागात तुलना केली तर ग्रामीण भागात बलात्काराचं प्रमाण प्रचंड कमी आहे. गावात एकमेकांशी संबंध असतात, संवाद असतो आणि महत्वाचं म्हणजे संपर्क असतात. समाजाशी असलेली बांधिलकी किंवा भीतीदेखील टिकून आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बलात्काराचं प्रमाण कमी आहे.